गोंदिया : जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या पूर्णपणे आटोक्यात आली आहे. सद्यस्थितीत तीन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी डेल्टा प्लसच्या अनुषंगाने खबरदारी आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. सर्दी, खाेकला, तापाची लक्षणे असणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. १९) ४८१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३९७ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ८४ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने शून्य नोंद होत आहे; तर पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी मलेरिया, डेंग्यू या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ४,४३,१३४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २,२४,४१३ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,१८,७११ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,१९७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. ४०,४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
..............
दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या वाढली
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६,९४,७७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात १,५२,९७२ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे; तर ४ लाखांवर नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.