गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आला असून, कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोनाने मानवी जीवन शैलीतसुद्धा अनेक बदल झाले आहेत, तसेच काहीसे बदल आहार आणि विहारामध्येसुद्धा झाले आहेत. त्यामुळे घरातील स्वयंपाकगृहात तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांची जागा आता पौष्टिक अन्नाने घेतली आहे. गृहिणींनी किचनमध्येसुद्धा बदल केल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर झाला. यामुळे ती कशी वाढविता येईल यावरच आता सर्वांचा भर आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणात कडधान्य, हिरव्या भाज्या आणि सलाद सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तेलकट पदार्थांना आता गृहिणींनी बाजूला ठेवत कुटुंबीयांची काळजी घेत पौष्टिक घटकांचा वापर वाढविला आहे. कोरोनाला प्रतिबंधात्मक ठरणाऱ्या आल्याचा रस, हळदयुक्त दूध, कडुनिंबाच्या पाल्याचा रस, आल्याचा चहा, निंबू पाणी, आयुर्वेदिक काढा आदी पेयांचा वापर केला जात आहे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गृहिणी दररोज नाश्त्यासाठी कडधान्याची उसळ, दूध, सलाद, अंडी आदींचा वापर वाढविला आहे. जेवणात वरण-भात, पोळी व हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढविला आहे.
........
कच्च्या भाज्या, कडधान्याचा वाढला वापर
- काेरोनाचा संसर्ग होऊ न देणे हाच मोठा खबरदारीचा उपाय आहे. यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गृहिणींनी दररोजच्या आहारामध्ये बदल करीत हिरव्या भाज्या, कडधान्य, सलाद यांचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे.
- कोरोनाचा धसका अनेकांनी घेतला. कोरोनाचे शरीरावर अनेक दुष्परिणाम झाले. अशक्तपणा व रोगप्रतिकारक्षमता कमी झाली. त्यामुळे गृहिणींमध्ये याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. त्यांनी कुटुंबीयांची काळजी घेत पौष्टिक आहारावर भर दिला आहे.
............
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेवणात हे हवेच
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा रोगप्रतिकारक्षमतेवर झाला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या जेवणात तुळस, मिरी, कलमी, लवंग, लसूण, अद्रक, हळद, सलाद, मोडयुक्त कडधान्य, अंडी, फळे, आयुर्वेदिक काढा, कोमट पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टींकडे आता अधिक लक्ष दिले जात आहे.
...........
फास्ट फूडवर अघोषित बंदी
कोरानामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन ते तीन महिने अनेक हॉटेल्स, रेस्टाॅरंट बंद होते. त्यामुळे अनेकांची फास्ट फूड खाण्याची सवय तुटली आहे. फास्ट फूड हे लहान मुलांसाठी घातक असल्याचे डॉक्टर सांगतात. कोरोनामुळे का होईना पालकांनीसुद्धा आता आपल्या पाल्यांना फास्ट फूडपासून बऱ्याच प्रमाणात दूर ठेवल्याचे चित्र आहे. थंड पदार्थ, आइस्क्रीम, हॉटेलमधील व उघड्यावरील पदार्थ खाणे टाळत असल्याचे दिसून येते.
..............
कोरोनापूर्वी गृहिणी कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनिवडीनुसार जेवण तयार करीत; पण आता तसे राहिले नाही. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:ची व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेत रोगप्रतिकारक्षमता वाढविणाऱ्या पदार्थांवर स्वयंपाकघरात भर देत आहे. त्यानुसारच आता दररोजचे जेवण तयार केले जात आहे.
- कविता शिवणकर, गृहिणी
..................
लाॅकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिकण्यासाठी बाहेरगावी राहत असलेली मुलेसुद्धा आता घरीच आहेत. मुले घरीच असल्याने त्यांच्या आवडीनुसार पदार्थ तयार करीत होते. मात्र, कोरोनामुळे किचनमध्येसुद्धा बरेच बदल करावे लागले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेत रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांवर अधिक भर दिला आहे. दररोजच्या नाश्त्यामध्ये अंडी, ऑम्लेट, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढविला आहे. कुटुंबाचे आरोग्य कसे चांगले राहील याकडे लक्ष दिले आहे.
- संगीता गुप्ता, गृहिणी
...........
कोरोनाने बऱ्याच नवीन गोष्टी शिकविल्या आहेत. यामुळे स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये बराच बदल झाला आहे. दररोजचा नाश्ता आणि जेवणाचे स्वरूप बदलले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थ बनविण्यावर अधिक भर देत आहे.
- रश्मी अग्निहोत्री, गृहिणी
................