गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता अधिक वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात असला तरी याकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकसुद्धा पार पडल्याची माहिती आहे.
मंगळवारी जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये गोरेगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६८१०५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५६४०० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे तर कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६७११५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले यापैकी ६०९६१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४२९९ कोरोनाबाधित आढळले असून १४०५९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर ४० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......
लक्षणे दिसताच रुग्णालयात जा
काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढ नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कुठलीही लक्षणे दिसताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जावून तपासणी करावी, अशा सूचनासुद्धा आरोग्य विभागाने दिल्या आहेत तसेच कोरोना टेस्टचे प्रमाणसुद्धा वाढविण्यात येणार असून कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्याची माहिती आहे.
........
मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरवासीय पुन्हा बिनधास्तपणे वागत आहे. मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच लग्नसोहळे आणि कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही ठिकाणी कोरोना संसर्ग वाढविणारी केंद्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
........
कार्यक्रमांमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना
गोंदिया जिल्ह्याची सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे थोड्या दुर्लक्षितपणामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गर्दी होणारे कार्यक्रम, विवाह सोहळ्याकरिता १०० लोक उपस्थितीत राहण्याची अट, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आदी गोष्टींची पुन्हा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर प्रशासनातर्फे मंथन सुरू असल्याची माहिती आहे.
..........