गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत जिल्ह्याती ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे ५० ते ६० वयोगटांतील आहे. यामागील कारण म्हणजे, यातील ७० टक्के रुग्ण हे आधीच विविध आजारांनी ग्रस्त होते. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हदयरोग, किडनी संबंधित आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. असे असले, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तरुण पिढीलाही बसला. २१ ते ३० वयोगटांतील १५ जणांचा तर ३१ ते ४० या वयोगटांतील २७ रुग्णांचा कोरोनाचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट तरुण पिढीसाठी घातक ठरली. कोरोना मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांचे मृत्यू हे त्यांना आधी असलेल्या आजारामुळे आणि कोरोनाचा संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर वेळीच उपचार न केल्याने झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनीही कोरोनाबाधितांच्या मृतकांचे ऑडिट केले. त्यातही आधीपासून असलेल्या दुर्धर आजारामुळेच ७० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची बाब पुढे आली आहे. मृतकांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
..........
३५ रुग्णांचा ४८ तासांतच मृत्यू
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांनी वेळीच उपचार केला नाही. ऑक़्सिजन लेव्हल कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तदाब वाढणे आदी कारणाने रुग्णालयात दाखल केल्यानंतर ३५ रुग्णांचा ४८ तासाच्या आतच मृत्यू झाला. या मागील प्रमुख कारणे वेळीच उपचार न घेणे आणि संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयात जाणे हेच कारण आहे.
............
सर्वाधिक रुग्ण मधुमेहाचे
- दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू हे ५१ ते ६० वयोगटांतील आणि त्या पाठोपाठ ६१ ते ७० या वयोगटांतील रुग्णांचे झाले आहे. यात बहुतेक रुग्ण मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त होते.
- उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर वेळीच उपचार केला नाही. परिणामी, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन मृत्यू झाला.
- मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह किडनी आणि हृदयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांत मृत्यू झाला.
- कोरोना संसर्ग काळात मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, तसेच वांरवार आरोग्य तपासणी करीत राहून नियमित औषधोपचार घेण्याची गरज आहे.
.....................
कोणत्या आजाराचे किती रुग्ण
मधुमेह : ९४
उच्च रक्तदाब : ४५
किडनी संबंधित आजार : २७
हृदय रुग्ण : ४३
...................
वयोगटनिहाय महिला आणि पुरुषांचे मृत्यू
महिला वयोगट पुरुष
० १० वर्षांपर्यंत १
० १० ते २० ०
२ २१ ते ३० १३
३ ३१ ते ४० २४
८ ४१ ते ५० ६९
९ ५१ ते ६० १००
१५ ६१ ते ७० ७५
७ ७१ ते ८० ४०
१ ८० वर्षांवरील १८
...........................................................