गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता जिल्ह्यातून पूर्णपणे ओसरला लागली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा १० टक्केच्या आत आहे, तर ऑक्सिजन बेडसुद्धा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे. त्यामुळे ब्रेक द चेनचे नियम थोडे शिथिल करण्यात आले. १ जूनपासून ॲनलॉक टूअंतर्गत शहरातील अत्यावश्यक आणि इतर दुकानेसुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केले. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने जणू जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याच्या आविर्भावात नागरिक वावरू लागले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे कोरोनाची संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता बळावली असून, पहिल्या लाटेत केलेल्या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती केली जात आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर चाचणी करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच वेळीच चाचणी करणे आदी गोष्टींकडे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करताना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तरच कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य आहे.
..............
या पाच चुका पुन्हा नकोच
१) कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर बंद केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. गर्दीच्या ठिकाणी जाणे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणाऱ्याकडे कानाडोळा केल्यानेच कोरोनाची दुसरी लाट आली.
२) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतरही अनेकांनी स्वत:च्या मनाने औषधोपचार केला. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व कोरोनाची चाचणी केली नाही. परिणामी संसर्गात वाढ होण्यास मदत झाली.
३) बाधितांच्या संपर्कात आल्याची खात्री पटल्यानंतरही अनेक जण कोरोनाची चाचणी होम क्वारंटाइन राहण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत झाली.
४) होम क्वारंटाइनमध्ये असलेले रुग्ण गृहविलगीकरणात न राहता घराबाहेर फिरत होते. यामुळे कुटुंबासह इतरांनाही संसर्ग झाला आहे. औषधोपचाराकडे दुर्लक्ष.
५) गर्दीच्या ठिकाणी जाणे, आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन न करणे, कोरोनाची चाचणी न करणे, काय होतोयची प्रवृत्ती यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती नकोच.
........................
अनलॉक : पहिला दुसरा
दिनांक : ४ ऑगस्ट १ जून
एकूण रुग्ण : ४१० ४०७४०
एकूण मृत्यू : ०३ ६९०