नवेगावबांध : रॅपिड अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृहविलगीकरणाची सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, बहुतांश गृहविलगीकरणातील बाधित रस्त्यावर फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे.
ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरण केले जाते. स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र स्नानगृह असावे. मात्र अशा प्रकारची सुविधा ग्रामीण भागात कित्येकांकडे नसते. त्यामुळे घरातील व्यक्ती बाधित व्यक्तीकडून संसर्गित होत असल्याचे समोर येत आहे. दोन किंवा तीन खोल्यात संसार करणारे बाधित व्यक्ती खऱ्या अर्थाने गृहविलगीकरणाचे निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी संसर्गाचा धोका वाढत आहे. तसेच शेजाऱ्यांनाही धोका पत्करावा लागत आहे. काही गावात कोरोनाबाधितांची घरे मायक्रो कंटोनमेंट झोन म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने घोषित केले जात नाही. घराच्या भिंतीवर स्टीकर लावली जात नाहीत. त्यामुळे सदर कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आहेत, हेच शेजाऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे शेजारीदेखील संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येतो. परिणामी, बाधितांची संख्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही वाढत आहे. कार्य समित्या कुचकामी ठरत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कार्य समित्यांचे गठन केले आहे. गावातील शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कोरोनाबाधितांच्या गृहविलगीकरणाची व्यवस्था असो की नसो, घरीच विलगीकरणात राहात आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका बळावला आहे.
.....
‘गृहविलगीकरणात असलेले बाधित व्यक्ती गावात फिरत असतात. अशा लोकांना पायबंद घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. याकडे ग्रामपंचायत व पोलीस खात्याने लक्ष द्यावे.
शैलेश शर्मा, सामाजिक कार्यकर्ते
‘बाधित व्यक्तींच्या घराच्या भिंतीवर स्टिकर लावण्याच्या नियोजनाबद्दल तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या गावात स्टिकर लावले जात नाहीत. त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा निर्देश देऊ, गृहविलगीकरणात असलेली व्यक्ती गावात फिरत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.
विनोद मेश्राम, तहसीलदार, अर्जुनी मोरगाव.
‘ज्याच्या घरी गृहविलगीकरणाच्या सुविधा नाहीत,त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत केली जाईल, गृहविलगीकरणातील बाधितांनी बाहेर फिरू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, तशी दवंडी गावात दिली जाईल.
अनिरुध्द शहारे, सरपंच, नवेगावबांध