गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या बघता बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे सेंटरच आता कोरोना संसर्गाचे केंद्र होत आहे. त्यामुळे येथे रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशात घरीच अलगीकरणात राहणाऱ्या बाधितांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असते. यामुळे घरीच अलगीकरणात राहण्यापेक्षा कोविड केअर सेंटरमध्ये राहणे योग्य असून यासाठी आरोग्य विभागाकडून बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. याअंतर्गत ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमधील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून तेथे रुग्णांची सोय करण्यात आली आहे. मात्र, सेंटर सुरू केल्यानंतर त्याच्या स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी दाखल असलेले कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याऐवजी अधिक आजारी पडण्याची शक्यता आहे.
....
बाथरूम व शौचालयात अधिकच समस्या
या सेंटरमधील संडास व बाथरूमची नियमित सफाई होत नसल्याने रुग्णांना अधिकच त्रास होत आहे. वॉश बेसीन आणि बाथरूममध्येसुद्धा घाणीचे साम्राज्य असून त्यांची नियमित सफाई होत नसल्याने संसर्गात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
........
मागील वर्षीही आल्या होत्या तक्रारी
मागील वर्षी कोरोनाने कहर केल्यानंतर येथेच कोविड केअर सेंटर होते व तेथील अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या. आता सेंटर सुरू होते न होते तोच तक्रारी येऊ लागल्याने आरोग्य विभागाकडून रुग्णांशी खेळ खेळला जात आहे, असेच चित्र आहे. मागील वर्षी जेवणावरून कित्येकदा वादाची स्थिती निर्माण झाली होती. त्यात आता एवढ्या गलिच्छ वातावरणात रुग्णांना ठेवले जात असल्याने पुन्हा रुग्णांकडून उद्रेक झाल्यास त्याला मात्र जबाबदार कोण राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-----------------------------------
बायोवेस्ट उघड्यावरच पडून
सेंटरमध्ये बायोवेस्ट उघड्यावरच पडून असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, यापासून कोरोना पसरण्याचा धोका असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा घाणीत ठेवण्यापेक्षा आम्हाला गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी येथे दाखल असलेल्या रुग्णांकडून केली जात आहे.
--------------------------------