गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, आता मागील महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असल्याने, कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी, आज जिल्ह्यातील सर्वच तालुके पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त झाले असून, अवघ्या जिल्ह्यालाच कोरोनाची लागण झाली आहे.
मध्यंतरी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असताना दररोज २-४ बाधित आढळून येत होते. परिणामी, क्रियाशील रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील ५ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा अवघ्या राज्यातच कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढताना दिसत आहे. हळुवार का असेना. मात्र, बाधितांची संख्या दररोज वाढू लागली असून, यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १४,६२४ बाधितांची नोंद घेण्यात आली होती. त्यातील १४,२५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता १८४ रुग्ण क्रियाशील आहेत. विशेष म्हणजे, क्रियाशील रुग्णांची ही आकडेवारी ५०च्या आत आली होती. मात्र, आता तीच आकडेवारी झपाट्याने वाढू लागली आहे. यावरून कोरोना जिल्ह्यातही आपले पाय पसरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात आता एकही तालुका कोरोनामुक्त राहिलेला नाही. यावरून येणारा धोका बघता, आतापासूनच सावध राहण्याची गरज आहे.
--------------------------
कारवायांची आता खरी गरज
कोरोनाचा वाढता धोका बघता, आता जिल्हा प्रशासनाने मास्क न लावणारे, शारीरिक अंतराचे पालन न करणारे, लग्न सोहळे व अन्य गर्दींच्या कार्यक्रमावर कारवाया करण्याची खरी गरज दिसून आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी याबाबत आदेश काढले होते व मात्र त्यानंतरही काहीच होत नसल्याने नागरिक बिनधास्त असून, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, हा प्रकार अंगलट येण्यासारखा असल्याने, गोंदियाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने हालचाल सुरू केली पाहिजे.
--------------------
बाजारात होते एकच गर्दी
कोरोनावर तोडगा म्हणून तोंडावर मास्क व शारीरिक अंतराचे पालन हे दोन प्रभावी शस्त्र आहे. मात्र, गोंदियातील बाजारात बघता कोरोना पूर्णपणे संपल्यासारखे चित्र असून, येथे मास्क व शारीरिक अंतराचे पालन या नियमांना तिलांजली दिली जात आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पूर्वीप्रमाणे पथक गठीत करून कारवायांना सुरुवात केली, तरच यावर आळा घालता येणार आहे, अन्यथा येणारा काळ जिल्ह्यासाठी धोक्याचा राहणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.