लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता शाळा आणि विद्यालयांमध्येसुध्दा कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आमगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विद्यालयाचे तब्बल १६ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याची बाब बुधवारी (दि.२४) अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढे आली आहे. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा मागील पाच दिवसांपासून बंद करण्यात आल्या आहे. मात्र दहावी आणि बारावीचे विशेष वर्ग सुरू आहेत. आमगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालय असून सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी याच शाळेतील एका बारावीच्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली होती. दरम्यान त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे मुख्याध्यापकांनी याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बुधवारी शाळेतील दहावी आणि बारावीच्या चाळीस विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात दहावीचे १४ तर बारावीचे दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. यामुळे शाळेत खळबळ उडाली असून आता विद्यालयातील एकूण १४० विद्यार्थी आणि शिक्षकांची सुध्दा कोरोना चाचणी केली जाणार आहे. १६ विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा आणि कनिष्ठ विद्यालयात बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच विद्यालयाचे पूर्णपणे सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असून याच दरम्यान विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने समस्या निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांने माहिती न दिल्याने वाढला संसर्ग जि.प.हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयातील एक विद्यार्थी कोरोना बाधित आला. मात्र त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या संपर्कात अनेक विद्यार्थी आले. यातून शाळेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याची माहिती शिक्षकांनी दिली. कोरोनाची माहिती लपवू नकाजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला वेळीच द्या. यामुळे वेळीच उपाययोजना करणे शक्य होवून संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी कळविले आहे.