गोंदिया : राज्यात कोरोनाचा उद्रेक बघावयास मिळत असतानाच जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याकडे लक्ष देत आरोग्य विभागाने जास्तीत जास्त तपासण्या करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सध्या मागील काही दिवसांची आकडेवारी बघता दररोज सुमारे तीन हजार तपासण्या होत आहेत. यामुळे तपासणीसाठी रुग्णालयांत रांग लागत आहे. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, तपासणीसाठी आलेल्या नागरिकांच्या रांगेतही फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. कोरोनाची तपासणी करण्यापूर्वी काही प्रक्रिया करावी लागते व त्यामुळे तपासणीस काही वेळ लागतो. अशात आपला नंबर लवकर लागावा व निघता यावे यासाठी नागरिक अंतर न पाळता एकमेकांच्या जवळजवळ लागूनच आपल्या नंबरची वाट बघताना दिसतात. कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे व वारंवार हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीवर अंमल करण्याची गरज आहे. मात्र, नागरिक यांनाच बगल देत असल्याने कोरोनाला फोफावण्यासाठी कारण मिळत आहे.
------------------------
वारंवार सांगूनही नागरिकांचे दुर्लक्ष
कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीवर काटेकोरपणे अंमल करण्याची गरज आहे. मात्र, नागरिकांकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता पुन्हा कोरोना फोफावू लागला आहे. अशात आता जिल्हा प्रशासनाकडून सक्तीने कारवाया करणे हाच एकमेव उपाय उरला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
--------------------------
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. असे असतानाही नागरिकांनी मास्कचा नियमित वापर व शारीरिक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्रिसूत्री हाच उपाय असून नागरिकांनी त्याचे पालन करावे.
- डॉ. नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.
-------------------------
-कोरोनाचे एकूण रुग्ण - १४७०६
- बरे झालेले रुग्ण - १४३१०
- एकूण कोरोना बळी - १८७
- सध्या उपचार सुरू असलेले - २०९
- जणांची दररोज तपासणी- सुमारे ३०००