गोंदिया : आज सोशल मीडियाने कोरोनासंदर्भात आहे त्यापेक्षा जास्त धोकादायक परिस्थिती दाखवून सामान्य नागरिकांत दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावानेच कित्येकांनी धसका घेतला असून त्याला जीवघेणे ठरवून दिले आहे. मात्र, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. केवळ यापासून बचावासाठी असलेल्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे वृत्तपत्रांपासून कोरोना होतो ही एक सपशेल अफवाच आहे. आज आपण बाजारातून कापड, किराणा किंवा अन्य वस्तू खरेदी करून आणत आहोत. त्यापेक्षा जास्त सुरक्षित वृत्तपत्र आहेत. प्रिंटिंगपासून ते पॅकिंगपर्यंत वृत्तपत्र सॅनिटाइझ केले जातात. शिवाय, वितरण करणारे हॉकर्ससुद्धा पूर्ण खबरदारी घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा यापूर्वीच वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. वर्तमानपत्र वाचल्यामुळे कोरोना झाल्याची घटना आतापर्यंत ऐकिवात नाही.
....
मुलांनाही वृत्तपत्रवाचनाची सवय लावण्याची वेळ
वृत्तपत्र समाजाचा चौथा स्तंभ असतानाच समाज विकासात प्रमुख भूमिका निभावतात. आज कोरोना आपल्या चरमसीमेवर पोहोचण्याच्या स्थितीत आहे. यामुळे भीती व संशयाचे वातावरण असून नागरिक वृत्तपत्रांपासून दूर झाले आहेत. मात्र, अशा स्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत नाही. वृत्तपत्र योग्य ती खबरदारी घेऊनच छापले व वितरित केले जातात. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या या वेळेचा फायदा घेत आम्ही आपल्या मुलांनाही दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावावी.
-डॉ. प्रशांत कटरे, गोंदिया
वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षितच
जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातही वृत्तपत्र छापण्याची प्रक्रिया मशीनव्दारे होत असल्याने आणि त्यांचे सॅनिटायझेशन केले जात असल्याने वृत्तपत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, कागद हा पोरस फॉर्ममध्ये असतो व त्यावर कोरोना विषाणू जास्त वेळ टिकाव धरू शकत नसल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. तर, वृत्तपत्रांचे वाचन केल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एकही उदाहरण नाही. वृत्तपत्र आम्हाला जगातील दररोजची माहिती पुरविणारे एकमेव विश्वासाचे साधन असून दैनंदिन जीवनातील अविभाज्य अंग आहे. त्यामुळे न घाबरता वृत्तपत्रांचे वाचन करा. मनात कुठलीही शंका न बाळगता वृत्तपत्रांचे वाचन करा.
- डॉ. कमलापती खोब्रागडे
गुदरोगतज्ज्ञ, गोंदिया
निर्भीड होऊन वर्तमानपत्रांचे वाचन करा
आज सर्वसामान्य माणसात वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, वर्तमानपत्रांच्या प्रिंटिंग ते वितरणापर्यंत त्यांचे सॅनिटायझेशन केले जाते. शिवाय, त्यांचे वितरण करणारेही पूर्ण खबरदारी घेत असल्याने वर्तमानपत्रांचे वाचन करणे धोकादायक नाही. त्यामुळे तुम्हीही खबरदारी घेऊन निर्भीडपणे वर्तमानपत्रांचे वाचन करा.
- डॉ. कृष्णा तिवारी
आर्थो सर्जन, गोंदिया
उपाययोजनांचे पालन करा
वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले. वर्तमानपत्रांच्या छपाईदरम्यान सॅनिटायझेशन केले जाते. त्यामुळे वर्तमानपत्रे ही पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. शिवाय, शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करून व स्वच्छता राखून वर्तमानपत्रे वाचता येतात.
- डॉ. चंद्रशेखर राणा
वर्तमानपत्रे समाजाचा अविभाज्य घटक
वृत्तपत्रे वाचण्याआधी व त्यानंतर हात धुणे गरजेचे आहे. आम्हीसुद्धा सर्व सुरक्षितता बाळगून आपले काम करीत आहोत. त्यामुळे सर्वांनाच सुरक्षात्मक उपाययोजना अमलात आणून आपले दैनंदिन कार्य सुरू करावे लागेल. वृत्तपत्रे आपल्या समाजाचा अविभाज्य घटक असून आपल्याला चालू घडामोडींबद्दल अचूक व विश्वसनीय माहिती देतो. त्यामुळे आपल्या घरी वृत्तपत्रे मागवून त्यांचे वाचन करा.
- डॉ. संजय डी. भगत,
माजी सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, गोंदिया जिल्हा