केशोरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतापगड येथे महाशिवरात्रीला ५ दिवस चालणाऱ्या यात्रेला लगाम लागली आहे. इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा प्रशासनाला महाशिवरात्रीला निर्बंध घालावे लागले आहेत. गर्दी होऊ नये, यासाठी जिकडे-तिकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांचा उर्स एकाच वेळी भरतो. यामुळे येथे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून असंख्य भाविक भगवान शंकराच्या दर्शनाला येतात. या तीर्थक्षेत्राला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जात असून, दगडाने बांधलेले ऐतिहासिक शिवमंदिर असून, पुरातन शिवलिंग आहे. कितीतरी पायऱ्या मोठ्या आनंदाने चढून भाविक महादेवाचे दर्शन घेतात; मात्र यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या फेरीचे संकट आल्यामुळे या यात्रेवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे फारसे भक्तगण दर्शनासाठी जाताना दिसले नाहीत. पुढील वर्षाची महाशिवरात्री कोरोनामुक्त असेल, अशी अपेक्षा करून यंदा कोरोनाचे नियम पाळू, असे भाविक बोलत आहेत. याठिकाणीच येथे जिकडे-तिकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.