गोंदिया : कोरोनाने अनेक गोष्टी प्रथमच घडताना पाहायला मिळाल्या. त्यातच अनेकांना कमी खर्चात जगायचे कसे याचा मार्ग दाखविला. यामुळे घरातील गृहिणींसह प्रत्येकाला काटकसर करण्याची सवय लागली. पगारात झालेली कपात आणि अनेकांचा रोजगार गेल्याने कमी खर्चात घर कसे चालवायचे याचे एकप्रकारे धडेच मिळाले, तर गृहिणींनी किचनपासून ते किराणा सामानापर्यंत अधिकाधिक बचत कशी करता येईल याच गोष्टीला प्राधान्य दिले. मागील दीड वर्षांपासून अनेकांचे कपात केलेले पगार अद्यापही पूर्ववत झाले नसून उत्पन्न कमी झाल्याने थोडक्यातच भागविण्याची सवय लागली आहे. गृहिणींनी भाजीपाला, किराणा, हॉटेलिंग या गोष्टींवरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. कटिंग दर वाढल्याने लहान मुलांची कटिंगसुद्धा घरीच करण्यास सुरुवात केली. नवीन कपडे खरेदी, चैनीच्या वस्तूंची खरेदी व अनावश्यक गोष्टींवर होणार खर्च टाळण्याचा प्रयत्न केला आहे. विजेचा काटकसरीने वापर करून एकप्रकारे गृहिणींनी सर्वच गोष्टींत काटकसर करून अनावश्यक खर्चाला ब्रेक लावला आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबांना बचतीचे महत्त्वसुद्धा कळले आहे.
.........
- लग्न समारंभ आणि बाहेरगावी जाण्याचा खर्च थांबविण्यात आला. आता गिफ्ट वस्तू घेण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. विजेचा वापर मर्यादित प्रमाणात केला. कपडे घरीच प्रेस करणे, गॅस सिलिंडरचा जपून वापर करणे आदी गोष्टींवर भर दिला.
- कोरोनामुळे बाहेर जायचे नसल्याने नवीन कपड्यांची खरेदी करणे टाळले, चैनीच्या वस्तूंची खरेदी कमी केली. गरज आहे त्याच गोष्टींना प्राधान्य दिले.
- कुटुंबाला काटकसर करण्याची सवय लावण्यात गृहिणींचा मोठा वाटा आहे. कोरोना काळात अनेक वाईट आणि चांगले अनुभव आल्याने बचतीला प्राधान्य देत ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे. त्याच खर्चाला प्राधान्य दिले.
...............
कुठे कुठे केली कॉस्टकंटिग
- वीज बिलात केली बचत
- सर्व कामे घरीच करण्याला प्राधान्य
- हॉटेलिंग, बाहेरुन वस्तू आणण्यावर नियंत्रण आणले.
- लहान मुलांचे कटिंग व कपडेसुद्धा घरीच प्रेस करण्याची सवय लावली.
- बाहेर जायचे नसल्याने नवीन कपडे खरेदी करणे टाळले.
- आवश्यक गोष्टींचा क्रम ठरवून त्यावरच खर्चाला प्राधान्य.
.............
गृहउद्योग करून कुटुंबाला हातभार लावला
कोरोनामुळे कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्न कमी झाले. मात्र, काही खर्च हे करावेच लागत असल्याने खर्च कमी केला. शिवाय कुटुंबाला आपलादेखील हातभार लागावा यासाठी पापड, लोणचे तयार करण्याचा गृहउद्योग सुरू केला, तसेच आवश्यक गोष्टींवरच खर्च करण्याला प्राधान्य दिले.
- कविता मेंढे, गृहिणी.
..................
अनेक गोष्टींत केली काटकसर
भाजी विक्री हा आमचा कुटुंबातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे भाजी विक्री करताना पुरेसा वेळ मिळत नव्हता, तर उत्पन्न देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाले. त्यामुळे अनेक गोष्टींवरील खर्चात बचत केली आणि काटकसर करून कमी खर्चात कसे घर चालविता येईल या गोष्टीलाच प्राधान्य दिले.
- संगीता उमक, गृहिणी.
...................
कोरोनाने काटकसर करण्याची सवय लावली
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने नोकरीवर असलेली मुले घरी परतली. त्यांच्या पगारातसुद्धा कपात झाल्याने उत्पन्न कमी झाले. त्यामुळे कमी खर्चात कुटुंब कसे चालवायचे याची सवय लागली. बऱ्याच अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च कमी केला. यामुळे संपूर्ण कुटुंबालाच काटकसर करण्याची सवय लागली.
- लीना पवार, गृहिणी.