देवरी : व्यापाऱ्यांची प्रत्येक १५ दिवसांनंतर कोरोना तपासणी आवश्यक असल्याची सूचना प्रशासनाद्वारे वारंवार देण्यात येऊनसुद्धा व्यापारी कोरोना तपासणीला प्रतिसाद देत नसल्याने देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या पुढाकाराने व तालुका वैद्यकीय अधिकारी ललीत बुरडे यांच्या सहकार्याने पंचशील चौक देवरी येथे शनिवारी (दि.१५) व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये ५० लोकांची आरटीपीसीआर तपासणी, तर ३६ लोकांची रेट तपासणी करण्यात आली. यात पाचजण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांची रवानगी सीसीसी सेंटरमध्ये करण्यात आली.
शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर तपासणी करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितले. तर कोरोना नियमाचे पालन करून शासनास सहकार्य करावे, असे अजय पाटणकर मुख्याधिकारी यांनी सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी ललित कुकडे यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. सुनील येरणे व आरोग्य विभागाची संपूर्ण चमू उपस्थित होती. रविवारी कोरोना तपासणीचा कॅम्प दुर्गा चौक देवरी येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व व्यापारी व त्यांच्या नोकरदारांनी आरटीपीसीआर चाचणी चाचणी करून घ्यावी.