नवेगावबांध : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू आहे. त्यातच ब्रेक द चेन अंतर्गत १५ जूनपर्यंत लॉकडाऊन असून सर्वसामान्य मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गावखेड्यातील मजुरांचे हालबेहाल आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची कामे सुरू करण्यात आली आहे.
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सिलेझरी, खांबी, सिरेगावबांध, बोरटोला ग्रामपंचायतने मनरेगा अंतर्गत कामे सुरू केली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागामार्फत ग्रामपंचायत सिलेझरी येथे व सिरेगावबांध, खांबी, बोरटोला येथे कामे सुरू केली आहेत. त्याठिकाणी कामावरील मजुरांची कामावरच कोरोनाची चाचणी करण्यात आली. तसेच औषधांचे वाटप करण्यात आले. तपासणी दरम्यान बाधित रुग्ण आढळून आले नाही. गटविकास अधिकारी यु.टी.राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेवरील मजुरांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते. काम सुरू असताना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये किंवा बाधितामुळे इतर मजुरांना संसर्ग होऊ नये. यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटीच्यावतीने ही कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांच्यासह, सामुदायिक आरोग्य अधिकारी काळे, सिलेझरीचे आरोग्य सेवक राऊत, दोनोडे, निमगावचे सातारे, सिलेझरीच्या, भिवखिडकी आरोग्य राऊत, मेश्राम, भारद्वाज, आरोग्यसेविका कोडापे यांनी या कोरोना चाचणीला सहकार्य केले.
नवेगावबांध सिलेझरी येथील मनरेगा कामावर कोरोना चाचणी करण्यात आली.