लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नगर परिषदेने आता शहरातील भाजी व फळविक्रेते तसेच अन्य व्यावसायिकांसाठी (सुपर स्प्रेडर्स) कोरोना चाचणी शिबिर सुरू केले आहे. नगर परिषद सभागृहात आयोजित या शिबिरात व्यावसायिकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दिनांक २१ व २२ तारखेला नगर परिषद सभागृहात हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये शुक्रवारी (दि. २१) शहरातील ९१ व्यावसायिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रविवारीही (दि. २३) हे शिबिर घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिकांना दर १५ दिवसांनी कोरोना चाचणी करावयाची असून, ती निगेटिव्ह आल्यास प्रमाणपत्र दुकानात स्वत:जवळ ठेवणे अनिवार्य आहे. तसेच ज्या विक्रेत्यांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असणार नाही, त्यांच्यावर एक हजार रूपयाची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या शिबिरासाठी डॉ. सुशील अंबुले, डॉ. जुनैद सय्यद व प्रयोगशाळा तंत्रज्ञ शुभांगी रहांगडाले सहकार्य करत आहेत. व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करुन कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सहकार्य करावे, असे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कळविले आहे.