अर्जुनी मोरगाव : शासकीय वैद्यकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये असमन्वय असल्याने सर्वसामान्य जनता त्यात भरडली जात आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या सबबीखाली अर्जुनी शहरातील कोरोना चाचण्या मागील पाच दिवसांपासून बंद आहेत. शासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कितीही प्रयत्नशील असले तरी अशा बाबी कोरोना वाढीला पोषक ठरत आहेत. कोरोना चाचणी केंद्र तातडीने सुरू करण्याची जनतेची मागणी आहे.
अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले कोरोना चाचणी केंद्र आठवडाभरापासून बंद आहे. शुक्रवारी आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी कोरोना आढावा घेतला. तेव्हा एक दिवसासाठी कोविड केअर सेंटरमध्ये चाचणी सुरू करण्यात आली होती. पण शनिवारपासून परत चाचणी केंद्र बंद झाले आहे. मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयातील चाचण्या बंद झाल्या. तर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील क्षेत्रात आमचे आरोग्य कर्मचारी चाचण्या करत आहेत असे तालुका आरोग्य कार्यालयाची यंत्रणा सांगत आहे. मग अर्जुनी शहरातील चाचण्या कोण करणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे. येथील चाचण्या करण्याची नेमकी जबाबदारी कुणाची? हे एक कोडेच आहे. ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या या वादात सामान्य जनता नाहक भरडली जात आहे. कोरोना चाचण्या होत नसल्याने निदान होत नाही व हे कारण कोरोना वृद्धीस पोषक ठरत आहे. आणीबाणीच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र येथे नेमका असमन्वय दिसून येत आहे.
.....
हेतुपुरस्पर चाचण्या बंद केल्याचा आरोप
कोरोना चाचणी केंद्र नाहक बंद पाडून जनतेची जाणूनबुजून पिळवणूक करण्याचे आरोग्य यंत्रणेचे हे कारस्थान असल्याचा जनतेचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळाची उणीव स्थानिक ग्रामीण रुग्णालयात शालेय आरोग्य तपासणी पथक होते. शाळा बंद असल्याने या पथकाला काम नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये काम देण्यात आले आहे.
....
शालेय आरोग्य तपासणी पथक परत पाठवा
ग्रामीण रुग्णालयाच्या या पथकातील ७-८ कर्मचारी कोविड केअर येथे कर्तव्यावर आहेत. कोरोना चाचणी करणे सोपे आहे. मात्र त्याची नोंदणी, आयडी तयार करणे, संकलित माहिती मुख्यालयाला कळविणे, त्यानंतर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या करणे यासारखी कामे करावी लागतात. यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते. ग्रामीण रुग्णालयात डाटा ऑपरेटर नसल्याची माहिती आहे. शालेय आरोग्य तपासणी पथक परत पाठविल्यास ग्रामीण रुग्णालयात चाचण्या होऊ शकतात. ग्रामीण रुग्णालयातील दोन कर्मचारी आमगाव व नागपूर येथे प्रतिनियुक्तीवर आहेत.