लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळताच या गटातील तरुणांनी लसीकरण केंद्राची धाव घेतल्याने लसीकरणाची आकडेवारी झपाट्याने वाढली असून त्यामुळे लसीचे डोस संपले आहेत. परिणामी, गोंदिया जिल्ह्यात बुधवारी (दि.३०) काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण झाले. तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यातील संपूर्ण साठाच संपल्याने लसीकरणाचा ब्रेक लागला होता. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे लसींचा पुरवठा सुरू आहे. परिणामी, आतापर्यंत सातत्याने लसीकरण सुरू असून नागरिकांच्या सुविधेसाठी आता जिल्ह्यात सुमारे १२५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. एवढेच नव्हे तर गावागावांत जाऊन तसेच शहरात प्रभागनिहाय लसीकरण शिबिर घेतले जात आहे. याचे चांगले फलितही मिळत असून २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील ४३६३६७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लसींचा तुटवडाही तेवढा जाणवला नसून उलट लसींचा साठा उपलब्ध होता. मात्र, २२ जूनपासून जिल्ह्यात १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाले व सुमारे ६.२५ लाभार्थ्यांच्या या गटातील तरुण लसीकरणासाठी सरसावले आहेत. लसीकरण सुरू झाले तेव्हापासून त्यांना लसीकरणाची उत्सुकता होती व परवानगी मिळताच ते आता समोर येत आहेत. परिणामी, आतापर्यंत ७७६०५ तरुणांचे लसीकरण झाले असून दिवसाला सुमारे १२०००-१५००० तरुणांनी लसीकरण करवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळे मात्र उपलब्ध साठा संपला आहे. यामुळेच ३० जून रोजी काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करता आले, तर गुरुवारी (दि.१) जिल्ह्यात लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लावावा लागला होता.
अद्याप काही मेसेजही नाही - जिल्ह्यातील लसींचा डोस संपल्याने लसीकरणाला आता ब्रेक लावण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अशी स्थिती आली असता लगेच लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. कित्येकदा अशी स्थिती निर्माण झाली असून प्रत्येक वेळी लगेच लसींचा साठा उपलब्ध करवून देण्यात आला आहे. मात्र, यंदा राज्यात सर्वत्र लसींचा तुटवडा असल्याची माहिती असून लस कधी मिळणार, याबाबत अद्याप तरी काहीच मेसेज आला नसल्याची माहिती आहे. दुसऱ्या डोसची अनेकांना प्रतीक्षा - जिल्ह्यातील ज्या व्यक्तींचा दुसरा डोस आला आहे अशा कित्येकांना मेसेज पाठविला जात आहे. मात्र, लसीकरण बंद असल्याने त्यांना आता लसींचा पुरवठा होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. विशेष म्हणजे, १८-४४ गटाचे लसीकरण सुरू झाल्याने केंद्रांवर तरुणांची एकच गर्दी होत आहे. अशात अन्य नागरिक गर्दी बघूनच परत जातानाही दिसत आहे.