गोंदिया : १८ ते ४४ वयोगटाला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाला गती आली असतानाच जिल्ह्यातील लसींचा साठा संपला असून त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. बुधवारी व गुरूवारी जिल्ह्यात होत्या तेवढ्या लसीनी लसीकरण आटोपले गेले. मात्र शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील सर्वच केंद्रावरील लस संपल्याने ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या नजरा आता लसींचा कधी पुरवठा होतो याकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली नव्हती तोपर्यंत लसीकरण सुरळीतपणे सुरू होते. मात्र २२ तारखेपासून १८ ते ४४ वयोगटाला सुरूवात करताच तरूणाई लसीकरणासाठी सरसावल्याचे दिसत आहे. यामुळेच आता लसीकरणात त्यांचेच प्रमाण जास्त असून या गटात दिवसाला १२,००० ते १५,००० दरम्यान लसीकरण केले जात आहे. परिणामी जिल्ह्यातील लसींचा साठा झपाट्याने संपला असून यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. त्यातही बुधवारी व गुरूवारी काही केंद्रामध्ये असलेल्या मोजक्या लसींचे लसीकरण करण्यात आले. मात्र आता त्याही संपल्या असल्याची माहिती आहे. परिणामी शुक्रवारी (दि.२) अवघ्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद होते व त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागला.
-----------------------------------
शनिवारपर्यंत लस येण्याची शक्यता
जिल्ह्यात लसींचा साठा संपला असून त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागले आहे. मात्र स्थिती अवघ्या राज्यासह अन्य काही राज्यात निर्माण झाली आहे. लसींचा पुरवठा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. मात्र शनिवारी १५,३०० कोविशिल्ड व ११,३०० कोव्हॅक्सिनचा पुरवठा होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर पुन्हा जोमात लसीकरण सुरू होणार आहे.
---------------------------
जिल्ह्यात ३३.८५ टक्के लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत ४,४०,०१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ३,४९,१२६ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची २६.८६ एवढी टक्केवारी आहे. तर ९०,८८७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची ६.९९ एवढी टक्केवारी आहे. लसीकरणाने आता वेग घेतला असला तरी हे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वत:च्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.