गोंदिया : जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि. ८ मार्च) खास महिलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यातील ४२७ महिलांना कोरोना लस देण्यात आली.
या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा दिशा समितीच्या अध्यक्ष भावना कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, डॉ. सुशांकी कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. शिल्पा पटोरिया, डॉ. मनोज टाळपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. मोहबे यांनी, कोरोना काळातील प्रतिकूल परिस्तिथीतसुद्धा सर्व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली त्याबद्दल सर्व महिला डॉक्टर्स व नर्सेसचे जागतिक महिला दिनाच्या पर्वावर कौतुक केले. डॉ. हुबेकर यांनी, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तेव्हा महिलांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व त्यासाठी घरातील ६० वर्षे वयोगटातील नातेवाइकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करावे, असे सांगितले.
कदम यांनी स्वतः लस घेतली व तुम्हीपण लवकर नोंदणी करून, घ्या असे सांगितले. लस दिल्यानंतर लाभार्थ्यांचे ३० मिनिटे निरीक्षण करण्यात आले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या विशेष मोहिमेसाठी डॉ. पाटोरिया व डॉ. हुबेकर यांनी सहकार्य केले. मोहिमेसाठी रूपाली टोने, पल्लवी वासनिक, विनय अवस्थी, पल्लवी राऊत, सचिन गौतम, प्रियांका राजपूत आदींनी सहकार्य केले.
---------------------
अशा प्रकारे केले लसीकरण
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिलांच्या लसीकरणाच्या विशेष मोहिमेत कार्यक्रमस्थळी २०८ महिलांना यशस्वीपणे लस देण्यात आली. तसेच तिरोडा येथे ५५, खमारी येथे ७४, आमगाव येथे ४३ व गंगाबाई रुग्णालयात ४७ महिलांना कोरोना लस देण्यात आली.
Attachments area