गोंदिया : कोरोना आता मात देण्यासाठी लस हाती आली असून, जस्तीतजास्त नागरिकांनी लस घेतल्यास कोरोनाला मात देता येणे आता शक्य आहे. यासाठीच आता शासनाकडून जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. यासाठी जिल्ह्यातही लसीकरणावर भर दिला जात असून, आतापर्यंत २,०४,६२६ नागरिकांना कोरोना कवच असलेली लस घेतली आहे. यात ४४,१३४ नागरिकांनी कोरोना लसीचा दुसराही डोस घेतला आहे.
मागील वर्षापासून अवघ्या जगात कोरोनाने कहर केला आहे. मात्र, तेव्हा कोरोना विरोधात लढण्यासाठी काही औषध नसल्याने कोरोनाचा धोका बळावला होता. मात्र, आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस तयार झाली असून, ही लस अत्यंत फायदेशीर असल्याचेही परिणामही पुढे येत आहेत. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात चांगलाच कहर केला. यामुळे कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शासनाच्या लक्षात आले आहे. यामुळेच आता देशात लसीकरणासाठी व्यापक मोहीम छेडण्यात आली आहे. ४५ वर्षे वयोगटांवरील प्रत्येकच नागरिकाला लस देण्यासाठी शासन जोर देत आहे.
यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर दिला जात आहे. प्रत्येकापर्यंत लस पोहोचावी, शिवाय लस घेण्यासाठी त्यांना सोय व्हावी, यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जात आहे. ऑनलाइन नोंदणीसह जागीच नोंद करून नागरिकांनी लस घेण्याची सोय करून दिली जात आहे. परिणामी, त्याला तसा प्रतिसाद दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत २,०४,६२६ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ४४,१३४ नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतल्याचे दिसत आहे.
------------------------------------
४५ वर्षांवरील प्रत्येकाने लस घ्यावी
लस घेणाऱ्या व्यक्तीवर कोरोना हावी होत नसल्याचे परिणाम आता बघावयास मिळाले आहे. यामुळेच शासनाकडून जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २,०४,६२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, आजही ४५ वर्षांवरील कित्येक नागरिकांनी लस घेतलेली नाही. मात्र, प्रत्येकाने कोरोनाशी लढण्यासाठी ही लस घ्यावे, असे आवाहन शासन व प्रशासनाकडून केले जात आहे.
------------------------------------
शासकीय केंद्रांवरच लसीकरणाचे प्रमाण जास्त
शासनाकडून देशवासीयांना मोफत लस दिली जात आहे, शिवाय ज्या व्यक्तींना शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावयाची त्यांच्यासाठी खासगी हॉस्पिटल्समध्येही लस उपलब्ध करवून देण्यात आली असून, एका डोस साठी २५० रुपये घेतले जात आहेत. जिल्ह्यात बघितल्यास शासकीय केंद्रात १,९७,०४८ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली असून, खासगी हॉस्पिटल्समध्ये फक्त ७,५७८ नागरिकांनी लस घेतल्याचे दिसत आहे.