कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळताच मनात एक वेगळाच धाक निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची हिंमत कोणी करीत नाही. मग ती व्यक्ती आपले खास, जिवलग, नात्यातली असली अगदी तरीही विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट भीती मनात असते. मग अशावेळी धार्मिक रूढीनुसार अंत्यसंस्कार करणे दूरच, अशा कठीण समयी धाडसाचे काम सध्या नगरपंचायत सालेकसाचे कर्मचारी करताना दिसत आहेत. यासाठी आमगाव खुर्द येथील मोक्षधामाची निवड करण्यात आली आहे. रात्री-बेरात्री तालुक्यातून कुठूनही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळताच नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या मृतदेहाचे अंत्यविधीचे कार्य केले जात आहे. वनविकास महामंडळाच्या आगारातून लाकडे आणण्यापासून ते सरण रचणे, तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या हस्ते दहन करणे, असे सर्व सोपस्कर रूढीपरंपरेने केले जात आहेत. यासाठी निर्जुंकीकरण, पीपीई किट, सामाजिक अंतर, अशा सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
बॉक्स
अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक
अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून, या पथकाचे पर्यवेक्षक म्हणून भीमराव भास्कर यांची निवड करण्यात आली आहे, तर पथकात अनिल नेवारे, कुवर साखरे, रवी मानकर, मनीष शेंद्रे, रवी नेवारे, ओमप्रकाश मानकर आदींचा समावेश आहे. या पथकावर निरीक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय चमूमध्ये अजय वाघमारे, अक्षय पटले, संदीप लहाने, कमलेश टेंभुर्णीकर, संतोष गभणे आदी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.