अर्जुनी मोरगाव : मागील महिन्यापासून काेरोना संसर्गाचा उद्रेक पुन्हा सुरु झाला आहे. त्यातच आता संसर्गाची आकडेवारी १००च्या वर येत आहे. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाचा फटका आठवडा बाजारांना बसला आहे. येत्या १५ मेपर्यंत आठवडा बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश अनेक ग्रामपंचायतींच्यावतीने देण्यात आले आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, सडक-अर्जुनी नगर पंचायत क्षेत्रातील आठवडा बाजार, गोंदिया तालुक्यातील एकोडी अशा विविध ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व आस्थापना, दुकाने, भाजीपाला विक्रेते आदींनी नियमांचे पालन करावे, तसेच आठवडा बाजार १५ मेपर्यंत बंद ठेवावे, असे आदेश काढले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील संसर्गाची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातही संसर्गाचा शिरकाव होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आठवडा बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याची भीती आहे.