अर्जुनी मोरगाव : कोरोना बाधित मृत व्यक्तीवर नगर पंचायतच्या सफाई कामगारांच्या माध्यमातूृन अंत्यसंस्कार केले जात आहेत. या दरम्यान सफाई कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊन जीवाचे बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न उपस्थित करीत कोरोना बाधित मृतांचे मृतदेह उचलणार नाही, असा इशारा नगर पंचायतच्या सफाई कामगारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली आहे. कोरोना बाधित मृत व्यक्तींवर नगर परिषद सफाई कामगारांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र कोरोना बाधित मृत व्यक्तींना हात लावण्यास डॉक्टरसुध्दा घाबरत आहेत. अशात कोरोना बाधित मृत व्यक्तींचे मृतदेह उचलण्याचे काम सफाई कामगार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत. यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनासुध्दा कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात एखाद्या सफाई कामगाराचा जीव गेल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, शिवाय शासनाकडूनसुध्दा कसलीच आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे कोरोना बाधित मृत व्यक्तींचे मृतदेह उचलणार नसल्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदनसुध्दा उपविभागीय अधिकारी आणि आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना दिले आहे. मृतदेह उचलण्यास नकार दिल्यानंतर वरिष्ठांकडून सफाई कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी केली आहे.