गोंदिया : आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सन २०१७ ते मे २०२१ या पाच वर्षातील माहिती घेतली असता गोंदिया जिल्ह्यात डेंग्यू वाढत आहे तर मलेरिया कमी होत आहे. चिकन गुनियाची परिस्थिती पाहता या पाच वर्षात गोंदिया जिल्ह्यात चिकनगुनियाचा एकही रूग्ण नाही.
डेंग्यूची परिस्थिती पाहता सन २०१७ मध्ये २० नमुने घेण्यात आले होते. त्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. सन २०१८ मध्ये ५० नमुन्यांपैकी ११ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०१९ मध्ये २१९ नमुन्यांपैकी ३७ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२० मध्ये ९३ नमुन्यांपैकी ४ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२१च्या मे पर्यंत २५ नमुने घेण्यात आले त्यात ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
मलेरियाची परिस्थिती पाहता सन २०१७ मध्ये ४ लाख ४५ हजार २३० नमुने घेण्यात आले होते. त्यात ६७४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सन २०१८ मध्ये ४ लाख २० हजार ७२५ नमुन्यांपैकी ३०१ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०१९ मध्ये ४ लाख ६८ हजार १३२ नमुन्यांपैकी १९७ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२० मध्ये ३ लाख २२ हजार ४५२ नमुन्यांपैकी ३४७ रुग्ण पॉझिटिव्ह, सन २०२१च्या मे पर्यंत १ लाख २७ हजार १०२ नमुने घेण्यात आले त्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. डेंग्यू वाढत आहे. तर मलेरिया कमी-कमी होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
.............................................
ही घ्या काळजी
किटकजन्य आजाराची साथ होऊ नये याकरिता आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, सभोवतालच्या परिसरात पाणी साठू न देणे, पाणी साठले असल्यास त्यामध्ये रॉकेल किंवा गाडीचे जळालेले तेल टाकावे.
रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. कोणताही ताप अंगावर न काढणे, आजाराची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आजाराचे त्वरित निदान करून उपचार करावे.
............................
डबक्यांमध्ये गप्पी मासे
१) कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक शासकीय रुग्णालयात गप्पी मासे पैदास केंद्राची निर्मिती करण्यात येत असून त्यामध्ये गप्पी माश्यांचा संचय करण्यात येतो.
२)शासनाकडून ज्या भागात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव अधिक प्रणात असतो अशा ठिकाणी दरवर्षी वर्षातून दोनदा कीटकनाशक फवारणी करण्यात येते.
....................
कोट
कीटकजन्य आजार (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया) चा प्रसार डासांपासून होत असून या आजारांचा प्रसार आटोक्यात ठेवण्याकरीता जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, आपल्या परिसरात मच्छरांची संख्या वाढू नये यासाठी सभोवताल पाणी साचू देऊ नये. कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधात आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या धूर फवारणी कीटकनाशक फवारणी या कामात सहकार्य करावे.
- डॉ, वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा हिवताप अधिकारी गोंदिया.
..........................
अशी आहे आकडेवारी
-------- डेंग्यू------------------ मलेरिया-------------- चिकनगुनिया
२०१७- २० नमुने १ पॉ.----४४५२३०--- ६७४ पॉ.-----००००-----
२०१८- ५० नमुने ११ पॉ.---४२०७२५---३०१--------०००----
२०१९- २१९ नमुने ३७ पॉ.---४६८१३२----१९७------०००---
२०२०- ९३ नमुने ४ पॉ.------३२२४५२---३४७--------०००---
मे २०२१- २५ नमुने ७ पॉ.----१२७१०२---२०------०००-----