अर्जुनी मोरगाव : शासनाच्या आदेशाप्रमाणे २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक सभा घेऊन पालकांच्या मनात असलेली कोरोना विषयी भीती घालविल्यामुळे तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा करून संरक्षणविषयक वातावरण निर्मिती केल्याने शाळेत आज विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसत आहे, असे वक्तव्य प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
कोरोना परिस्थितीत ८ महिन्यांच्या कालावधीनंतर २३ नोव्हेंबर रोजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या प्रगतीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने वर्ग ९ व १० च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय व खासगी शिक्षण संस्था सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून संस्थाचालकांवर टाकण्यात आली. त्यानुसार सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जीएमबी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या दृष्टीने पालक सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ सुद्धा शासननिर्णयानुसार सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. परंतु ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या तेथील विद्यार्थी उपस्थिती संख्या नगण्य आहे. याला अपवाद म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सरस्वती विद्यालय व जीएमबी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये मात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती आढळून आली आहे. शाळेने केलेले यशस्वी नियोजन, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला कल व शिक्षकांचे अध्यापन, स्थानिक सुविधा यांची सोय यामुळेच हे शक्य झाले. वारंवार पालकांच्या संपर्कात राहून पालक शिक्षक सभा आयोजनातून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात कोरोना विषयी असलेली भीती दूर करण्यात यश आल्याने हे शक्य झाले, असे मत मंत्री यांनी व्यक्त केले.