गोंदिया : जून महिन्यापासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खाली येत असून जुलै महिन्यात तीच स्थिती असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून कोरोनाचा रिकव्हरी रेट सुध्दा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीय थोडे बिनधास्त झाले आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी नागरिकांनी निष्काळजीपणा न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१९) जिल्ह्यात ५२९ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४६९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ६० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात दोन नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०. ३७ टक्के आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २,११,२४७ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,८६,१५२ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत २,२०,८५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९९,७७२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१७४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०,४६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..............
राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस
जिल्ह्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानेच कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरु आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९८.४ टक्के असून तो राज्यापेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे राज्यापेक्षा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सरस असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
.........