गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून यामुळेच सहा तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र दररोज बाधितांची संख्या कमी वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांतही कोरोना पुन्हा शिरला आहे. परिणामी रविवारी (दि.१) जिल्ह्यातील ६ पैकी ३ तालुकेच कोरोनामुक्त होते. यावरून कोरोना नियंत्रणात असला तरीही काळजी घेण्याची गरज आणखीच वाढली असल्याचे दिसते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रमाणात झपाट्याने वाढली होती. परिणामी जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४११९२ एवढी झाली आहे. तर ४०४७९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी आता जिल्ह्यात फक्त ११ क्रियाशील रुग्ण उरले आहेत. दररोज १-२ एवढेच बाधित नोंदले जात असून यावरून जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते. शिवाय यामुळेच जिल्ह्यातील ६ तालुके कोरोनामुक्त झाले होते. मात्र दररोज बाधित निघतच असल्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांत पुन्हा कोरोना शिरला असून यामुळे आता फक्त सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी तालुका कोरोनामुक्त आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आकडेवारीवरून परिस्थिती नियंत्रणात दिसत असली तरी कोरोनाचा हा लपंडाव जिल्हावासीयांना खबरदारीचे संकेत देणाराच दिसत आहे.
-----------------------------
४ बाधित घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात रविवारी एकूण ११ क्रियाशील रूग्णांची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये १ बाधित इतर जिल्हा व राज्यातील असून १० बाधित जिल्ह्यातील आहेत. त्यातील ४ बाधित घरीच अलगीकरणात आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक ४ बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत.
-----------------------------
लवकरात लवकर लस घ्या
कोरोनापासून स्वत:च्या व आपल्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही कित्येकांकडून आताही लस घेणे टाळले जात असल्याचे लसीकरणाला असलेल्या कमी प्रतिसादावरून दिसून येत आहे. मात्र लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित होण्याची गरज असल्याने नागरिकांनी लस घेण्यास टाळाटाळ करण्यापेक्षा लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.