गोंदिया : जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून कोरोनाबाधितांचा तीनचा पाढा कायम आहे. पण मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात असली, तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि. १०) ५४८ बाधितांनी कोरोनावर मात केली; तर ५१० नवीन रुग्णांची नोंद झाली. नऊ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी आढळलेल्या ५१० रुग्णांमध्ये सर्वाधिक २९० गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६३, गोरेगाव २३, आमगाव २४, सालेकसा ४९, देवरी ४८, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने आतापर्यंत १,३९,६७४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,१६,१७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिट अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १,४२,७३२ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२२,५०१ नमुने निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत ३७,५४६ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी ३२,८७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४०६९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३३४८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.....
१ लाख ८० हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचा भर सध्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८०,७८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे; तर १८ ते ४४ वयोगटांतील ४३६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
..........