गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आहे. मंगळवारी (दि.२४) जिल्ह्यात बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २१२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १७५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ३७ नमुन्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेट शून्य होता. मागील दोन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ ४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ३ रुग्ण गृहविलगीकरणात असून एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ४४४४८० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२५६१५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८८६५ नमुन्यांची रॅपिट अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४११९९ नमुने कोरोनाबाधित आढळले, तर ४०४९३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी चार तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून चार तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आहे.