लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढ होता तर कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या पुढेच होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजारांवर गेली. मात्र, मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट वाढत आहे. सोमवारी (दि.३) मागील वीस दिवसांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या तीनशेच्या आतच होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्ह्यात सोमवारी ६७५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर २४० नवीन रुग्णांची नोंद झाली. ९ बाधितांचा खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी आढळलेल्या २४० बाधितांमध्ये सर्वाधिक ११४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ४४, गोरेगाव २७, आमगाव ७, सालेकसा ५, देवरी ३०, अर्जुनी मोरगाव ८ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३५६८७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११०३९९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १३८४३१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ११९०९६ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४४०५ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २८८९० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४९५६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४२०७ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
कोरोना बरे होण्याचा दर वाढला
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत मागील आठ दहा दिवसांत विक्रमी वाढ झाली आहे. या कालावधीत जवळपास ८ हजारांवर नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८३.९७ टक्के झाला असून त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.