प्रभाव लोकमतचा
सालेकसा : गोदामे असतील त्याच ठिकाणी रब्बीचे धान खरेदी सुरु करावे असे आदेश शासनाने काढले होते. परिणामी आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी संकटात आली होती. लोकमतने हा मुद्दा उचलून धरला. यानंतर आदिवासी सहकारी संस्था, आदिवासी प्रकल्प अधिकारी व पणन अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात धान खरेदी व साठवणूक करुन ठेवण्यासाठी सबंधित केंद्राच्या ठिकाणी असलेल्या आश्रम शाळांमधील काही रिकाम्या खोल्या आणि सभागृहे उपलब्ध देण्यास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.
१ जूनपासून रब्बी पिकाची धान खरेदी सुरु करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली होती. आदिवासी महामंडळाच्या सहकारी संस्थाकडे स्वत:चे गोदाम उपलब्ध नसल्याने आणि उघड्यावर रब्बीच्या धानाची खरेदी करु नये असे आल्याने त्या तारखेला धान खरेदी सुरु होऊ शकली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत आला तर खरेदी केंद्राचे संचालक सुध्दा अस्वस्थ झाले होते. संस्था चालक आणि महामंडळाचे प्रतिनिधी यांनी दिवसभर विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संपर्क चालविला. शंकर मडावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांची सुध्दा भेट घेतली. परंतु काही जबाबदार लोक उपस्थित नसल्याने तोडगा निघाला नाही. दरम्यान लोकमतने २ जूनच्या अंकात आदिवासी महामंडळाची धान खरेदी आली वांद्यात या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. तेव्हा शासन प्रशासन खळबळून जागे झाले. २ जूनला देवरी येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयात संस्था चालक आणि पणन अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेण्यात आली. यात चर्चेअंती आदिवासी प्रकल्पातंर्गत आश्रम शाळांची गोदामे धान खरेदीसाठी उपयोगात आणण्याचा प्रस्ताव ठेवला. प्रकल्प अधिकाऱ्यांने सध्या बंद व रिकामे असलेल्या आश्रम शाळा धान ठेवण्यासाठी देण्याची परवानगी दिली.
............
४ जूनपासून होणार खरेदीला सुरुवात
रब्बीचे धान देवरी उपविभाग अंतर्गत एकूण १९ केंद्रावर खरेदी केले जात होते. यापैकी ११ संस्थाची गोदामांची समस्या निकाली लागली असून त्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उद्या ४ जूनपासून थेट धान खरेदी सुरु करणार तर सात संस्था सुध्दा सुरु करण्याच्या धावपळीत लागल्या आहेत. गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे हित पुढे ठेवून लोकमतने सातत्याने मुद्दे उचलून धरल्याने आदिवासी सहकारी संस्थानी लोकमत वृत्तपत्राचे आभार मानले.
.......
११ खरेदी केंद्राचा मार्ग मोकळा
आदिवासी उपविभाग देवरी अंतर्गत एकूण १९ पैकी ११ धान खरेदी केंद्राचा धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून त्यामध्ये आठ केंद्राना शासकीय आश्रम शाळा दोन केंद्राना खासगी गोदाम आणि एका केंद्राला समाज मंदिर उपलब्ध झाले आहेत. ज्या केंद्रांना आश्रम शाळा उपलब्ध करुन देण्यात आले. त्यामध्ये बोरगाव, ककोडी, गणुटोला, पुराडा, पालांदूर, चिचेवाडा, दरेकसा, लोहारा यांचा समावेश आहे. अंभोरा आणि सातगाव येथे खासगी गोदामात खरेदी होणार तर गोेर्रे येथे समाज मंदिरात खरेदी व संकलनाची व्यवस्था केली जाईल. या सर्व ठिकाणी आवश्यक कार्यवाही केल्या नंतर ४ जूनला खरेदीला सुरुवात होणार आहे.