गोंदिया : संगणक प्रशिक्षणाचे देयक काढून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पर्यवेक्षिका व प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिकेला रंगेहात पकडले. तिरोडा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात मंगळवारी (दि. १९) ही कारवाई करण्यात आली. अंजली गोविंदराव बावनकर (४९) असे पर्यवेक्षिका व प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, तर उषा यशवंत आगाशे असे अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार आयजीएम कम्प्युटर नावाचे संगणक संस्था चालवित असून, जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ३५ मुलींना २० डिसेंबर २०२० पासून वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे त्यांचे प्रशिक्षण शुल्क जमा केले आहे. ३० डिसेंबर रोजी तक्रारदाराने संगणक प्रशिक्षण शुल्क देयकाबाबत बावनकर यांना फोनवर विचारपूस केली. यावर त्यांनी देयक तयार करून पंचायत समितीकडे पाठविण्यासाठी प्रतिलाभार्थी ६०० रुपयेप्रमाणे २१ हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने १५ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. प्रकरणी पथकाने सोमवारी (दि.१८) पडताळणी केली असता बावनकर व आगाशे यांनी तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यावर पथकाने मंगळवारी (दि.१९) तिरोडा रेल्वेस्थानकात सापळा लावला असता बावनकर यांनी पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली व त्या रंगेहात अडकल्या. दोघांविरुद्ध गोंदिया रेल्वे पोलिसांत कलम ७ लाप्रका १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.