गोंदिया : ग्रामपंचायत गांधीटोला अंतर्गत भजीयादंड येथील गट क्रमांक ५०४ मध्ये वनविभागामार्फत विविध कामे करण्यात आली. या कामांत बोगस मजूर दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड झाली आहे. काही ठिकाणी कामे न करतासुद्धा बिले काढण्यात आली. त्यामुळे वनअधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सालेकसा तालुक्यातील मक्काटोला बीट अंतर्गत भजीयादंड येथे सन २०१८-१९ या वर्षात वनविभागामार्फत गट क्रमांक ५०४ आराजी १५ येथे वनरक्षक ए. टी. बोपचे यांच्या कार्यकाळात रोपवनाचे काम करण्यात आले. यात १५ हेक्टरला ३० बाय ३० बाय ३० सेंमी.चे ३७,५०० खड्डे खोदण्यात आले. शासनाच्या जीआरनुसार एमबी व आकाराप्रमाणे प्रति खड्ड्याचे खोदकाम १२.३३ पैसे याप्रमाणे आहे. मात्र, मजुराला प्रति नऊ रुपयांप्रमाणे खात्यावर देण्यात आले. यात चार लाख ६२ हजार ३७५ रुपये मजुरांना देण्याऐवजी तीन लाख ३३ हजार ५०० रुपये देण्यात आले. यामध्ये एक लाख २८ हजार ८७५ रुपयांचा अपहार करण्यात आला असून, काही मजूर बोगस दाखविण्यात आले आहेत.
ज्या मजुरांची नावे मस्टरवर आहेत त्या गांधीटोला वा दुर्गुटोला येथील रहिवासी असल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, ते मजूर तेथील रहिवासी नसल्याचे गांधीटोला ग्रामपंचायतीने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच खड्डे भरण्याचे काम न करताच ७७ हजार रुपयांची उचल करण्यात आली. व्हाऊचरनुसार रोपे लागवडीमध्ये बोगस मजुरांची हजेरी लावून निधीची उचल करण्यात आली.
देवाटोला ते भजीयादंड येथे रोपे वाहतूक खर्च एक लाख पाच हजार रुपये दर्शविण्यात आला असून किटकनाशक फवारणीकरिता २९ हजार २८३ रुपये खर्च दाखविण्यात आला. रासायनिक खत खरेदी व खत देण्यासाठी २६ हजार ५६६ रुपये, कीटकनाशक औषध खरेदी व औषध फवारणीसाठी २९ हजार २८३ रुपये खर्च दाखविण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीही खरेदी करण्यात आली नाही. केवळ कागदोपत्री व्हाऊचर तयार करून व बोगस मजूर दाखवून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार करण्यात आला. यात तत्कालीन राऊंड ऑफिसर संजय पटले यांची भूमिका मुख्य आहे.
वनरक्षक एस. यू. मोटघरे यांच्या कार्यकाळात प्रथम निंदणीचे काम करण्यात आले. यात एक लाख ६५ हजार २१५ रुपये खर्च झाले. हजेरीप्रमाणे मात्र ६० हजार रुपयांचे बोगस व्हाऊचर बिल तयार करून उचल करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बोगस मजूर दाखवून जे कधीही कामावर गेले नाहीत, अशा लोकांची नावे आहेत. वनरक्षक आर. जे. कोसरे यांच्या कार्यकाळात द्वितीय निंदणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात काम झालेच नाही. तरी यात गांधीटोला व दुर्गुटोला येथील मजूर दाखवून ४० हजार ४४६ रुपये ८६ पैसे याप्रमाणे निधीची उचल करण्यात आली. यातील १० मजूर बोगस आहेत. तृतीय निंदणीचे पैसे प्राप्त झाले नव्हते तरी प्रत्यक्षात काम न करता २५ मजुरांचे व्हाऊचर बिल तयार करण्यात आले. यात २३ मजूर दुर्गुटोला व २ मजूर गांधीटोला येथील दाखवून एक लाख ५८ हजार ३६० रुपये उचलण्यात आले.
या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी वनसमितीचे माजी अध्यक्ष प्रेम मुनेश्वर यांनी केली आहे. कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा दिला आहे.