आॅनलाईन लोकमतसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत रोजगार सेवक गौतम शहारे यांनी बोगस मजूर दाखवून मनरेगामध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. शहारे यांना पदावरुन हटविण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात आर.सी. पांदण रस्ता मक्काटोला-कडोतीटोला ते शिवमंदिर या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार सन ८ जुलै २०१७ ते १४ जुलै २०१७ या कालावधीत सदर मार्गावर मुरूम पसरविण्याचे काम करण्यात आले. या कामावर जे मजूर हजर होते, त्यांची नावे हजेरी पटावर न टाकता जे कामावरच नव्हते त्यांची नावे हजेरी पटावर टाकण्यात आली. त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करुन त्यांच्याकडून वसूल करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.यासंबंधीची तक्रार गावकऱ्यांनी खंडविकास अधिकारी सालेकसा तसेच वरिष्ठ अधिकाºयांना केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे.त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रा.पं. ला ९ जानेवारीला आदेश देऊन रोजगार सेवकाविषयी ग्रामसभेत विषय ठेवून निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार १९ जानेवारी २०१८ रोजी सभा घेण्यात आली. सभेत रोजगार सेवक गौतम शहारे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच त्यांना हटविण्याबाबत चर्चा झाली. मात्र त्याबाबत बहुमत न मिळाल्याने सभेत हटविण्याबाबत ठराव पारित होऊ शकला नाही.तसेच रोजगार सेवकाने मजुरांचे कामगार कल्याण मंडळाचे फार्म भरण्याची फी ८५ रुपये असताना मजुरांकडून १५० रुपये घेतले. पैसे घेऊनही वेळेत फार्म भरले नाही, असाही आरोप गावकऱ्यांनी केला होता. त्यामुळे रोजगार सेवकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी संतोष शहारे यांनी केली होती.याबाबत रोजगार सेवक गौतम शहारे यांच्याशी संपर्क साधला असता, गावकºयांनी लावलेले आरोप खोटे असून काही लोक व्यक्तिगत कारणातून माझी तक्रार करतात. कोणत्याही प्रकारचे बोगस मजूर हजेरी पटावर दाखविलेले नाही. तसेच मजुरांचे कार्ड बनविण्याकरिता घेतलेले पैसे परत करण्यात आले. यात कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे पदावरुन हटविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही व ग्रामसभेत गावकऱ्यांनी माझ्या बाजुने बहुमत दिले असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.