अत्री येथील प्रकार : सरपंच व ग्रामसेवकावर आरोप, लहान मुलाच्या नावे काढले देयकपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत अत्री ग्रामपंचायतला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. यात सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक सविता पारधी दोषी असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच टोईराम बिसेन यांनी वरिष्ठांकडे केली आहे.निर्मल योजनेत १२४ कुटुंबांना लाभ देण्यात आले होते. मात्र बीपीएल, अनुसूचित जाती-६, एपीएल ६, एपीसी, विधवा महिला प्रमुख ५, एपीसी भूमिहिन १०, एपीएल अल्पभुधारक शेतकरी ४१, बीपीएल अन्य ५६ लाभार्थी यांना लाभ सन २००६-०७ मध्ये देण्यात आला. शासन निर्णयानुसार ज्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले त्यांना दुसऱ्यांना देत येत नाही, असे निर्देश आहेत. मात्र ग्रामसेवक सविता पारधी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंब संख्या दाखवून त्यांनाच दाखविण्यात आले. गरजू व पात्र गरीब लाभार्थ्यांना डच्चू देण्यात आला. गावात २३ शौचालय मंजूर करण्यात आले. मात्र जिवंत असून व घटस्फोट झाले नसून त्यांना विधवा म्हणून दाखवून व शाळेत शिकणारी लहान मुलगी वेगळे राहत असल्याचे सांगून त्यांना लाभ देण्यात आला आहे. पात्र नसतानाही पात्र असल्याचे सांगितले आहे. प्रमिला गेंदलाल बागडे किडंगीपार येथे राहत असून वडिलाचे नाव देऊन व पतीचे नाव कापून लाभ देण्यात आला. गोपीचंद तोलन पारधी बाहेरगावी राहत असून त्यांनाही लाभ देण्यात आला. रिक्की रेखलाल मौजे, महेंद्र हिरामन येसने, अतुल प्रल्हाद माहुरे, विनोद योगराज उरकुडे, रविंद्र निखाडे, देवेंद्र उरकुडे, मंगेश पटले, राजेश उरकुडे, धमेंद्र उरकुडे, निकेश रहांगडाले, रामप्रसाद माहुरे, अश्विन गजबे, विलास वरडी, होलीचंद बिसेन लहान मुले असून यांना लाभ देण्यात आला आहे. ढोमनाथ रिनाईत यांना मुलगा नसून मुलगा सांगून हितेंद्र या नावाने लाभ देण्यात आला. यात कित्येक नावात फेरबदल करण्यात आले. मात्र १२ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला. यात लाभार्थ्यांनी स्वत: बांधकाम न करता ग्रामपंचायतीने कंत्राटदाराशी साठगाठ करुन कमिशन घेऊन काम केले. तेही निकृष्ठ दर्जाचे तयार करण्यात आले. या सर्व प्रकरणाची तक्रार ग्रा.पं. चे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते टोईराम बिसेन यांनी बीडीओ, सीओ, जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदार यांच्याकडे केली आहे. आता काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित सरपंच, तत्कालीन ग्रामसेवकावर योग्य कारवाही करुन निलंबित करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेविका सविता पारधी यांची बदली गोंदिया तालुक्यातील गर्रा येथे झाली असून कार्यरत ग्रामसेवक धुर्वे यांनी सांगितले की त्याअगोदर बोदा येथील पटले ग्रामसेवक यांनी पदभार सांभाळला. मला नंतर देण्यात आला. सर्व सर्व्हेक्षण सविता पारधी यांनी केले व काही लाभार्थ्यांना देयकही पारधी व पटले यांनी दिले. (वार्ताहर)
शौचालय बांधकामात भ्रष्टाचार
By admin | Published: November 28, 2015 2:57 AM