उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : २.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त गोंदिया : गोंदिया ते आमगाव मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना सावकारटोलीजवळ देशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या टाटा सुमो वाहनाला पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी (दि.१८) सकाळी ८ वाजताच्यादरम्यान करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त करीत असताना टाटा सुमो गोल्ड (क्रमांक एमएच ३५, पी-४५५६) संशयास्पदरित्या आढळली. त्यामुळे त्या गाडीला अडवून तपासणी केली असता सदर वाहनात १८० मिलीच्या देशी दारुच्या बाटल्यांची एक पेटी अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे दिसले. वाहनचालक उत्तमचंद मोहन खांडेकर (४५) रा.अदासी तांडा याला लगेच ताब्यात घेऊन वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर खांडेकर याच्या अदासी तांडा येथील घराची झडती घेतली असता घरातून १८० मिलीच्या २ पेट्या देशी दारु जप्त करण्यात आली. सदर गुन्ह्यातील १८० मिली क्षमतेच्या १४४ बाटल्या व टाटा सुमो वाहन असा एकूण २ लाख ७२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासोबत दुय्यम निरीक्षक एस.एल. बोडेवार, दुय्यम निरीक्षक चिटमटवार, बी.जी. भगत, आर.के. निकुंभ, हुमे व जवान हिबे, ढाले, मागोटे, कांबळे, उईके, मुनेश्वर, ढोमणे, वाहन चालक मिर्झा, मडावी, सोनबर्से यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)
चारचाकी वाहनासह देशीचा मद्यसाठा जप्त
By admin | Published: February 19, 2017 12:08 AM