लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : बोदरा (देऊळगाव) या आपल्या राहत्या गावावरून लग्नकार्यासाठी आसोली येथे मोटारसायकलने जात असताना गावापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावरील बोदरा राखीव वनात (गवळी देव) बिबट्याने रहदारीच्या रस्त्यावर येऊन त्यांना जबरदस्त धडक दिल्याने दोघे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. ६) सकाळी ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. आत्माराम काळसर्पे (५४) व प्रतिभा अरुण काळसर्पे (४५) असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत बोदरा निवासी अरुण काळसर्पे हे पत्नी प्रतिभासोबत नातलगताच्या लग्नकार्यासाठी आसोली (महागाव) येथे जाण्यासाठी मोटारसायकलने बोदरा-अर्जुनी-मोरगाव मार्गावरून सकाळी ११ वाजतादरम्यान निघाले. हा मार्ग जंगल शिवारातून जात असून बोदरा बीटातील राखीव वन कम्पार्टमेंट क्रमांक- २७९ हा भाग वन्यप्राण्यांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. या मार्गावर वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. पत्नीला सोबत घेऊन अरुण काळसर्पे गावापासून २ किलोमीटर अंतरावर (गवळी देव) येथे येताच झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून उडी मारली. ध्यानीमनी नसताना बिबट मोटारसायकलच्या समोर आडवा आल्याने दोघेही मोटारसायकलवरून कोसळून पडल्याने गंभीर जखमी झाले. जंगल शिवारात लाकूड तोडणाऱ्या मजुरांनी धाव घेतली व त्या दोघांना रुग्णवाहिकेतून अर्जुनी-मोरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले असून दोघेही धोक्याबाहेर आहेत. घटनेची माहिती मिळताच बोंडगावदेवी सहवनक्षेत्राचे क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, वनरक्षक डी. डी. कोकाटे, दिनेश मुनेश्वर, सतीश राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. बिबट्याच्या धडकेत जखमी झालेल्या पती-पत्नीला त्वरित आर्थिक मोबदला देण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली.
परिसरात बिबट्याची दहशत - दिवसाढवळ्या गावकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने बोदरा, देऊळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यात शनिवारी (दि. ५) भरदुपारी बिबट्याच्या एका बछड्याचे चक्क गावात दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती संचारली आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरीत आहे.