गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असून हे बघता राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. यामध्ये आता हॉटेल्स व लहान-मोठ्या टपऱ्या व चायनिजवाल्यांनाही दिलासा मिळाला आहे. यामुळे मात्र आतापर्यंत घरात कोंडून असलेले नागरिक मोकाटपणे घराबाहेर पडत असून सोबतच बाहेरच्या खाण्यावर ताव मारताना दिसत आहे. आतापर्यंत घरात राहून बाहेरचे पदार्थ खाता आले नसल्याने ते आता आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चाट व चायनिज ठेल्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. मात्र पावसाळ्याचा काळ आजारांचा काळ असून त्यात मागील वर्षापासून कोरोना विषाणूची भर पडली आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने पुढील व्यक्तीपासून पसरत आहे. तरी देखील नागरिक बाहेरचे खाण्यासाठी गर्दी करीत आहेत. शिवाय बाहेरच्या पदार्थात वापरण्यात येणारे तेल, मसाले, पाणी व तेथील स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे घटक असून यात जराही कमी-जास्त झाल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. यामुळेच पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळणेच महत्त्वाचे असून घरातील साधे जेवण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-------------------------------
रस्त्यावरचे खाणे नकोच
रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या टपऱ्यांमध्ये खाद्य पदार्थ स्वस्त मिळत असल्याने कित्येकदा पैसे वाचविण्याच्या नादात नागरिक रस्त्यावरचे पदार्थ खातात. मात्र त्या पदार्थांना बनविताना पाहिजे तशी स्वच्छता बाळगली जात नाही. शिवाय तेल, मसाले, भाज्या व पाण्याची गुणवत्ता नसल्यास ते खाद्य पदार्थ आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरतात. अशातूनच फूड पॉईजनिंग होते व यामुळेच कधी-कधी जीवही जातो. ग्रामीण भागात असले प्रकार घडताना दिसतात. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे खाणे नकोच.
--------------------------------
पावसाळ्यात हे खायला हवे...
- मेथीच्या दाण्यात एंटीमायक्रोबायल तत्त्व असल्यामुळे इंफेक्शनपासून आपला बचाव होते त्यामुळे मेथीच्या दाण्याचे पाणी प्यावे.
- पावसाळ्यात कारल्याचा ज्यूस तसेच तुळस, हळद, लवंग, वेलची, काळीमिरी, दालचिनी यापासून घरात तयार केलेला काढा प्यावा.
- हंगामानुसार येणारे फळ जसे जांभूळ, आवळा, लिची यांचे सेवन करावे.
- हंगामानुसार येणाऱ्या भाज्या जसे परवल, दोडके, दुधी आदींचा आपल्या आहारात समावेश करावा.
- जेवणात डाळींचा वापर करावा तसेच बदाम खावे व नियमित गरम पाणी प्यावे.
------------------------
पावसाळ्यात हे खाणे टाळावे...
- पावसाळ्यात इंफेक्शनचा धोका जास्त असल्याने बाहेरचे चिप्स, पेस्ट्री, शिळे जेवण, रस्त्यावरील पदार्थ खाऊ नये.
- कच्च्या भाज्यांमध्ये पावसाळ्यात किटाणू उत्पन्न होत असल्याने त्या खाऊ नये.
- मिठाचे प्रमाण जास्त असणारे खाद्य पदार्थ पावसाळ्यात खाऊ नये.
- दही व पनीर यासारखे पदार्थ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेऊन खाऊ नये व मांसाहार टाळावा.
- कोम येणाऱ्या पदार्थांत (उसळ) किटाणू उत्पन्नाचा धोका असल्याने ते खाऊ नयेत.
- पावसाळ्यात पोट खराब होणे, डायरीया यासारखे त्रास उद्भवत असल्याने जेवणात जास्त तेलाचा वापर करू नये.
--------------------------------
कोट
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला पुष्कळ प्रमाणात घाम येतो. यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी व सूप प्यायला हवे. बाहेरच्या खाण्यातून इंफेक्शनचा धोका असून त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशात बाहेरचे खाणे टाळावे व घरातील साधे जेवण घ्यावे.
- डॉ. मौसमी शाह (ब्राम्हणकर)
आहारतज्ज्ञ
-------------------------------------
कोट
पावसाळ्यात बाहेरील पदार्थांमुळे त्यातही रस्त्यावरील पदार्थांमुळे कित्येक प्रकारचे आजार उद्भवतात. अशात रस्त्यावरचे खाणे टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपल्या आहारात कमी तेल व मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश करावा. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले तसेच उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.
- डॉ. विनोद मोहबे
जनरल फिजिशियन