गोंदिया : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता आता आरोग्य विभागाने उपाययोजनांसाठी हालचाल सुरू केली आहे. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या रुग्णांपासून धोका बळावू नये यासाठी लगतच्या ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून (दि.२२) हे सेंटर सुरू करण्यात आले असून, येथे ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता गंभीर चित्र निर्माण करीत आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.२१) तब्बल ९२ नवीन बाधितांची भर पडल्यानंतर आता एकूण बाधितांची संख्या ४६६ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील ४९७ क्रियाशील रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. अशात त्यांच्यापासून काही धोका निर्माण होऊ नये या दृष्टीने अधिकाधिक रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच ठेवता यावे यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा पॉलिटेक्निक कॉलेज अधिग्रहित केले असून तेथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये ११० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, आरोग्य विभागाने अन्य तालुक्यातील रुग्णांना तेथेच अलगीकरणात राहण्याची सोय व्हावी यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करावयाचे असून यात, गोंदियातील जिल्हा क्रीडा संकुलचाही समावेश आहे. याला परवानगी मिळाल्यानंतर तेथेही कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असून, येथेही बाधितांची व्यवस्था केली जाणार आहे.