सडक-अर्जुनी : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शासकीय व खासगी रुग्णालये देखील रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. त्यामुळे सडक-अर्जुनी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी व वेळीच औषधोपचाराची व्यवस्था व्हावी याकरिता डॉ. अजय लांजेवार यांनी एस. चंद्रा नर्सिंग कॉलेज येथे (दि. २४) कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मागील महिन्यापासून आरोग्य विभाग व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून तसेच डॉ. आर. एस. देशमुख यांच्या सहकार्याने एस. चंद्रा नर्सिंग कॉलेज सडक-अर्जुनी येथे ७५ खाटांचे बेड असलेले सुविधापूर्वक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. आर. एम. देशमुख, डॉ. सतीश लंजे, डॉ. धनंजय कापगते यांचा सहभाग असणार आहे. कोविड केअर सेंटर सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्य केल्याचे डॉ. अजय लांजेवार यांनी सांगितले.