लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात उकाडा सुरू झाला. आजघडीला गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४०.४ अंश असताना कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना कोविडपेक्षा उकाड्याचाच अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया जिल्हा उष्ण असतो. मार्च महिन्यात ३५ अंशाचे तापमान असलेला गोंदिया आता एप्रिल महिन्यात ४० अंशापेक्षा अधिक तापमान गेले आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या या उन्हामुळे सिमेंटच्या इमारतीत रात्रीपर्यंत मोठी गरमी असते. गोंदिया जिल्ह्यातील काही कोविड सेंटरमध्ये कुलर लावण्यात आले तर बहुतांश ठिकाणी कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही. आमगावच्या भवभूती महाविद्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अजूनपर्यंत कुलर लावण्यात आले नाही. एका अधिकाऱ्याचा नातेवाईक कोविड पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यासाठी फक्त एकच कुलर भवभूती महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये लावण्यात आला. आमगावचे तहसीलदार यांनी सहा कुलर भवभूती महाविद्यालयात लावण्यासाठी आणले होते. परंतु एकच कुलर सुरु असून उर्वरित पाच कुलर खर्च अधिक पडतो म्हणून परत नेल्याचे तेथील रुग्णांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
एप्रिल तापला
- पूर्व विदर्भात असलेला गोंदिया दरवर्षी उष्ण असतो. गोंदिया जिल्ह्याच्या उन्हाची एवढी तीव्रता की उष्माघाताने अनेकांचा बळी जातो.
- यंदाच्या मार्च महिन्यात गोंदिया जिल्ह्याचे तापमान ३५ अंश असताना आता एप्रिल महिना तापू लागला आहे. एप्रिल महिन्याचे तापमान ४० अंशावर गेल्याने रुग्णाचे हाल होत आहेत.
- एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोंदियाचे तापमान ४०.४ अंश असतांना मे महिन्यात हे तापमान ४५ अंशाच्या घरात जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोरोनापेक्षा उकाड्याचाच त्रास
१) कोरोनाचा त्रास बघून उपचार घेण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालो, परंतु कोविड सेंटरमध्ये काहीच सुविधा नाही. उन्हाळ्याच्या दाहकतेपासून बचाव करण्यासाठी कुलरची व्यवस्था करायला हवी परंतु कुलरची व्यवस्था न केल्यामुळे या कोविड केअर सेंटरमध्ये राहणे कठीण झाले आहे.
- हिरामन दिवाळे, रुग्ण
२) एका त्रासाबरोबर दुसराही त्रास सहन करावा लागतो. कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालो, परंतु येथे ना कुलरची सुविधा ना कुणी लक्ष देते. उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कोविड सेंटरची देखरेख ज्यांच्याकडे आहे त्यांनी याकडे लक्ष देऊन रुग्णांचा त्रास कमी करावा.
- जगन्नाथ पाथोडे, रुग्ण