गोंदिया : कोरोना संसर्ग काळात आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस, शिक्षक, तलाठी व इतर कर्मचारी कर्तव्य बजावित आहेत. या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग हाेऊन काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे; मात्र याची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती; मात्र पुन्हा कोविडचा संसर्ग सुरु झाला असल्याने याला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने केली होती. त्याला अखेर यश आले असून ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शासनाच्या वित्त विभागाने १४ मे २०२१ रोजी कोविड सानुग्रह अनुदान विमा योजनेला ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात असल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध भागात कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य, महसूल व शिक्षण विभागातील अनुदानित व विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्य करीत आहेत. कोरोना विषयक जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे तसेच विविध कामात ते सहकार्य करीत आहेत. याच दरम्यान काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग सुद्धा झाला आहे. शासनाने कोविड कार्यात कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. पण याची मुदत डिसेंबर २०२० मध्ये संपली. तर जानेवारी २०२१ पासून सर्वत्र पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला असून अनेक कर्मचाऱ्यांचा उपाययोजना करताना मृत्यू झाला आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे विमा संरक्षण योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने शासनाकडे वारंवार लावून धरली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून शासनाने विमा संरक्षणाला अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून याबद्दल शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्र अंबुले, जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रकुमार गौतम व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.
.......
कोविड कार्यातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या कामात आरोग्य, महसूल यंत्रणेसह शिक्षक देखील कार्य करीत आहेत. अशात शासनाने या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. याला आता शासनाने मुदतवाढ दिल्याने हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.