केशोरी : या परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या स्थितीत हलक्या जातीच्या धानाचा निसावा परिपूर्ण झाला आहे. अवघ्या आठ दहा दिवसांत हलक्या जातीच्या धानाचे पीक शेतकऱ्यांचा हातात पडेल, अशी स्थिती असताना निसवा झालेल्या धानावर रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे कळप शेतात शिरुन धान पिकांचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने लक्ष देवून रानडुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामात हलक्या जातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, सध्या स्थितीत हलक्या धानाचा निसवा पूर्णपणे झाला आहे. जंगल लागून असलेल्या शेतशिवारात रात्रीच्या वेळेस रानडुकरांचे कळप शेतात प्रवेश करुन धान पिकाचे नुकसान करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी रानडुकरांपासून धान पिकाचे होत असलेले नुकसान वाचविण्याच्या प्रयत्नात कापडी साड्यांचे कुंपण केले आहे. परंतु रानडुकरांचे कळप साड्यांचे कुंपण फाडून शेतात प्रवेश करुन मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान करीत आहेत. ऐन हलक्या धान पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडेल एवढ्यात रानडुकरांचा हैदोस वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.