गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, यात गोंदिया तालुका हॉटस्पॉट असल्याने शेकडोंच्या संख्येत बाधितांची भर पडत आहे. यामुळे शासकीयच नव्हे, तर खासगी रुग्णालयांतही बेड उपलब्ध नाहीत. अशात केटीएस रुग्णालयाला लागूनच असलेल्या नगर परिषदेच्या एस. एस.गर्ल्स स्कूलमध्ये कोविड वॉर्ड तयार करता येणार असल्याचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले आहे.
जिल्ह्यात बाधितांची भर पडत असतानाच, त्यामध्ये सर्वाधिक संख्या गोंदिया तालुक्यातील बाधितांची आहे. यामुळे आता केटीएस रुग्णालयासह शासकीय क्वारंटाईन सेंटर व खासगी रुग्णालयातील बेड भरले आहेत. परिणामी रुग्णांना बेड मिळत नसून, त्यांची गैरसोय होत आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना सांगितले.
तसेच बेडची क्षमता वाढविता यावी, यासाठी केटीएस रुग्णालयाला लागून असलेल्या नगर परिषदेच्या एस. एस. गर्ल्स स्कूलमध्ये कोविड वॉर्ड सुरू करण्यास सुचविले आहे. विशेष म्हणजे, केटीएस रुग्णालय व शाळा या दोन्ही इमारतींमध्ये १० फुटांची सुरक्षा भिंत असून, ती काढल्यास दोन्ही इमारती थेट जुळतील. तसेच येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपाचारासाठी २४ तासांच्या आत अतिरिक्त कोविड वॉर्ड तयार होऊ शकतो, असेही अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी मीना यांना सुचविले आहे. यावर मीना यांनी लगेच केटीएस प्रशासन व नगर परिषदेकडून माहिती घेऊन शाळेत अतिरिक्त वॉर्ड सुरू करण्याचे आश्वासन अग्रवाल यांना दिले आहे.
-------------------------------
ऑक्सिजन व रेमडेसिविरची व्यवस्था करा
बाधितांची संख्या वाढल्याने बेड मिळत नसतानाच ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. अशात खासगी रुग्णालयांतूनही रुग्णांच्या नातेवाईकांनाच इंजेक्शनची व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे. मात्र यामुळे रुग्णांची मृत्यू संख्या वाढत असल्याने या विषयावर अग्रवाल यांनी राज्याचे औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नागपूरसाठी नामदार नितीन गडकरी यांनी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे. मात्र गोंदियात अशी व्यवस्था करणारा कुणी नसल्याचेही त्यांना सांगितले. यावर नामदार शिंगणे व आयुक्त काळे यांनी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था करवून देण्याचे आश्वासन दिले आहे.