लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा रेल्वे चौकी व तिरोडा रेल्वे स्थानक यांच्या मध्यंतरी चिरेखनी गावाच्या पांदण रस्त्यावर तिरोडा शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे लाईनच्या खालून रस्त्याशी संलग्न अंडरग्राऊंड पूल तयार करण्यात यावे. या मागणीचे निवेदन चिरेखनी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच जगन्नाथ पारधी यांनी तिरोड्याच्या रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहे.निवेदनानुसार, चिरेखनी ग्राम ते तिरोडा शहरात जाण्या-येण्यासाठी फार पूर्वीपासून रेल्वे लाईन ओलांडून जाण्यायेण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रवास दररोज सुरूच आहे. चिरेखनीच्या हनुमान मंदिरापासून शासकीय पांदण रस्त्याने नागरिकांची ये-जा सतत सुरूच असते. बाजारहाट, शाळा-कालेज, उपजिल्हा रूग्णालय व इतर कामानिमित्त येथील रहदारी होतच आहे. परंतु विद्यमान धावपळीच्या काळात अतिजलद वाहतुकीमुळे रेल्वे लाईनवरून रस्ता ओलांडताना गुरेढोरे व माणसेही मृत्यू पावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच चिरेखनी ते तिरोडाची येथील रहदारी बंदही होवू शकणार नाही. याचे कारण म्हणजे चिरेखनीवासीयांसाठी हा अत्यंत शार्टकट रस्ता आहे. सदर अंडरग्राऊंड पूल तयार झाला तर तिरोडा रेल्वे चौकीवर फाटक बंद असल्यामुळे होणारी गर्दी कमी होईल.अपघात टाळण्यासाठी व बिनधोक रहदारीसाठी रेल्वे प्रशासनाने सदर ठिकाणी अंडरग्राऊंड पुलाचे बांधकाम करावे, अशी आधी तोंडी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सर्व ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहे.
अंडरग्राऊंड पूल तयार करा
By admin | Published: June 19, 2017 1:29 AM