लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हलबीटोला येथील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे या शेतकऱ्याच्या शेतात बनावट देशी दारू करून त्याचा पुरवठा जिल्हाभरात करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली. गुरुवारी (दि.१८) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख ७४ हजार ७१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता हलबीटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. दारू बनविण्याचा कोणताही वैध परवाना नसताना सुद्धा मानवी जीवितास धोका उत्पन्न येईल यांची पूर्व जाणीव असूनही नशाकारक व अपथ्यकारक रसायन व फ्लेवर वापरून अवैधरीत्या बनावटी दारू तयार करून ते परवाना युक्त दारूसारखी नकली दारू तयार करीत होते. आरोपी हेमंत बन्सीलाल पद्माकर (४२, रा. गोरेगाव) याने हलबीटोला शेतशिवारातील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे (रा. महावीर कॉलोनी, गोरेगाव) यांच्या मालकीचे घर करार तत्त्वावर घेऊन त्याचा वापर बनावट देशी-विदेशी दारू कारखान्यासाठी करीत होता. या कामासाठी आरोपी कामगार हनीफ रमजान शेख (४२), मेहताब नादरखाँ पठाण (३८), नजीर ईसराईल सय्यद (३०), आशिकअली सवालशाह सय्यद (३०, सर्व रा. कुऱ्हाडी) हे अवैध दारू गाळत होते. ती दारू देशी-विदेशी दारूच्या बाटल्यात भरून लोकांना सेवन करण्यासाठी पॅकिंग करून ठेवलेली होती. सोबत देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण सहा लाख ७४ हजार ७१० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या संदर्भात आरोपींवर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भादंविच्या कलम ३२८ सहकलम ६५ (ई)(फ), ६७,८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर आरोपींना रात्री ८.४७ वाजता अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, सूर्यभान जाधव, संगीता कडव व इतरांनी केली आहे.
एवढा माल पकडला याप्रकरणात बनावटी देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी तयार करण्यात येणारे रसायन, एक लाख २७ हजार २०० रूपये किमतीचे गोवा व्हिस्कीचे लेबल लावलेल्या बनावटी दारूच्या १६ पेट्या, ४८ पव्वे असलेल्या १७ पेट्या, मॅकडाॅवेल्स नं. - १ लेबल लावलेल्या बनावटी इंग्रजी दारूचे ३१ पव्वे, रॉयल स्टॅगचे लेबल लावलेले बनावटी १८ नग पव्वे, फिरकी संत्रीचे लेबल लावलेल्या बनावटी देशी दारूचे १५० पव्वे जप्त करण्यात आले.