गोंदिया : कोरोनाचा कहर सुरू असतानाच मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम घेऊन त्यात कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी न करता गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे, आमगाव येथे साखरपुड्याचे असे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व त्या दोन्ही कार्यक्रमांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरू असूनही साखरपुडा सारख्या कार्यक्रमात अजूनही लाेकांची गर्दी आहे. त्यात मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करता २६ मे रोजी आमगाव येथे मुलीच्या वडिलांनी साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी ४० लोकांना आमंत्रीत केले होते. यापवर पोलीस शिपाई सुरेंद्र राजकिशोर लांजेवार यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १५२/२०२१ भादंवि कलम १८८,२६९ सहकलम ३ साथरोग प्रतिबंधक अन्वये नोंद करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या कारवाईतही २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता आमगाव येथेच मुलीच्या पित्याने आपल्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम परवानगी न घेता आयोजित केला व ३० ते ४० लोकांना बोलावून घेतले. मात्र त्या कार्यक्रमात लोकांनी मास्क लावले नव्हते व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. यावर शिपाई लांजेवार यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक १५३/२०२१ भादंविचे कलम १८८.२६९ सहकलम ३ साथरोग प्रतिबंधक अन्वये नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गजपुरे करीत आहे.