गोंदिया : मे महिना संपत असताना शेतकऱ्यांचे रब्बीतील धान सरकारने खरेदी करण्यासाठी धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नवेगावबांधच्या आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात गुरुवारी (दि.२०) धान नेऊन त्याचे ढिगार टाकले. जेव्हापर्यंत आमचे धान खरेदी करत नाही तेव्हापर्यंत हे धान त्याच ठिकाणी राहू द्या, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. परंतु, आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर नवेगावबांध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकऱ्यांनी आपला हक्क मागण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात आपले धान नेऊन टाकले. मे महिन्याचा शेवट होत असतानाही सरकारने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी २० मे रोजी सकाळी ११.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात धान टाकले होते. नवेगावबांध येथील पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांच्या तक्रारीवरून शेतकऱ्यांवर भादंविच्या कलम १४३, १४५, १४९, १५१, १८८, २६९, २७०, २९१ सहकलम ३७ (३), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम ५१ (ब), सहकलम २, ३, ४, साथरोग प्रति अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हेगडकर करीत आहेत.