गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वडेगाव व डव्वा येथील तीन दुकानदारांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ दुकान सुरू ठेवल्यामुळे त्या तिन्ही दुकानदारांवर डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डव्वा येथील अग्रवाल बर्तन ॲन्ड ठेक्टीक स्टोर्स सुरू ठेवून कोरोनासंदर्भात असलेल्या नियमाचा भंग करण्यात आला. १५ मे रोजी दुपारी १२ वाजता आरोपी दुकानदाराने कोविड - १९ विषाणूचा प्रादुर्भाव संसर्गजन्य रोगाची साथ सुरू असताना प्रतिबंध करण्याकरिता शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करता दुकान सुरू ठेवले. त्याच्यावर पोलीस नाईक संतोष राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८, २६९, २७० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार धावडे करत आहेत.
दुसरी कारवाई १५ मे रोजी दुपारी १२.५० वाजता डव्वा येथेच करण्यात आली. प्रियांश ट्रॅक्टर रिपेरिंग दुकानदाराने दुकान सुरू ठेवले होते. पोलीस नाईक जगदीश मेश्राम यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, २७० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार धावडे करत आहेत. तिसरी कारवाई १५ मे रोजी दुपारी १.३० वाजता वडेगाव येथे करण्यात आली. चुटे ट्रेडर्स हे दुकान सुरू ठेवून दुकानचालकाने नियमाचा भंग केला. पोलीस नाईक संतोष राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, २७० सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सांदेकर करत आहेत.